स्वरांश तबला आणि हार्मोनियम क्लासमध्ये गुरुपूजन सोहळा उत्साहात साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

स्वरांश तबला आणि हार्मोनियम क्लासमध्ये गुरुपूजन सोहळा उत्साहात साजरा

गौतम नगरी चौफेर (विनोद खंडाळे गडचांदूर 20 जुलै 2025) –
गडचांदूर येथील स्वरांश तबला व हार्मोनियम क्लास मध्ये रविवारी दिनांक 20 जुलै 2025 रोजी गुरुपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या नटखटपणात आणि कलागुणांनी सर्वांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवी सरस्वती माता यांच्या पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरस्वती वंदना सादर केली आणि दीपप्रज्वलन करून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना अभिवादन करत गुरुपूजन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले विद्यार्थ्यांचे सांगीतिक सादरीकरण. मुलांनी तबल्यावर ठेका धरत आणि हार्मोनियमवर सुर छेडत गायनाच्या माध्यमातून उपस्थितांचे मन मोहून टाकले. त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून, श्री. उद्धवरावजी कुचणकर बाबा, श्री. चंद्रकांत मोरे सर, श्री. संदीप उमरडकर सर, श्री. मुरलीधरजी धवस, श्री. फणीशंकर सर हे मान्यवर उपस्थित होते.

श्री. कुचणकर बाबांनी ‘गुरुपूजनाचे महत्त्व’ या विषयावर मुलांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर सौ. मोरे ताईंनी आणि श्री. संदीप सरांनी देखील मुलांशी संवाद साधत त्यांना अभ्यासात, जीवनात यशस्वी होण्यासाठी मौल्यवान टिप्स दिल्या.स्वरांश क्लासचे सर्वांचे लाडके शिक्षक श्री. फणीशंकर सर यांनीही आपल्या खास हिंदी शैलीत सुंदर भाषण करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमात क्लासमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक आणि बक्षिसांद्वारे गौरव करण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आणि अभिमान याने संपूर्ण सभागृह भारले गेले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विलास चुंणे सरांनी समारोप करत सर्वांचे आभार मानले आणि पुढील वर्षीच्या गुरुपूजनाची चाहूल दिली.
यानंतर उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन व्यवस्था यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदतीचे सहकार्य केलेल्या श्री. चंद्रकांत मोरे सर, श्री. संदीप उमरडकर सर, श्री. फणीशंकर सर आणि स्वरांश तबला-हार्मोनियम क्लासचे विद्यार्थी
यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकवृंद, पालक, आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन!
आता वाट पाहूया पुढील वर्षीच्या गुरुपूजनाची…संगीताचा हा साज आणि सन्मान अशाच पद्धतीने दरवर्षी वाढत जावो, हीच गौतम नगरी चौफेर परिवारातर्फे मंगलमय खुप साऱ्या शुभेच्छा!

COMMENTS

You cannot copy content of this page