गौतम नगरी चौफेर विशाल पावडे – कोरपना तालुक्यातील हिरापूर, हेटी, नारंडा आदी गावांमध्ये बैल जोडी चोरीच्या घटनांनी शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या बैलजोड्या लक्ष्य केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून परिसरात सतर्कतेचे वातावरण आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री हिरापूर येथे पुन्हा एकदा बैल चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावकऱ्यांची चाहूल लागल्याने चोरटे आपला डाव अर्धवट सोडून पसार झाले. या घटनेमुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता व्यक्त होत आहे. शेतीकामासाठी बैलजोडी ही महत्त्वाची संपत्ती असल्याने अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यास सुरुवात केली असून संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तरीही या चोरीच्या मालिकेमुळे ग्रामीण भागात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, तसेच रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वेळेत कारवाई न झाल्यास पुढील काळात अशा घटना वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
COMMENTS