गौतम नगरी चौफेर ( शिवराम पाटील जळगाव) – बुध्दीवंतांचा,विचारांचा गळा दाबणे म्हणजे कुबुद्धि आहे. या लढाईत दोन पक्ष असतात.काही लोक सत्याच्या बाजूने उभे असतात, लढतात काही असत्याच्या म्हणजे दुर्जनांच्या बाजूने. ते चूक कि बरोबर, हे त्यांच्या हितसंबंधावर अवलंबून असते. रावणाकडून सुद्धा लढणारे होतेच. ते रामा कडून लढणाऱ्यांना चुकीचे समजत असतील. अरे राम तर , त्याच्या पत्नी ची सुटका करण्यासाठी लढत आहे. पण हा हनुमान, हे वानर उगीच कशाला जीव धोक्यात घालत आहेत!
तरीही असा मानव असतो, असा प्राणी असतो तो जीव धोक्यात घालून सत्याच्या बाजूने लढतो. हनुमान आणि वानरांसारखे. ते पगारावर किंवा जेवणावर काम करीत नाहीत. कोणाचे ऐकून चुप होत नाहीत. ही सत शक्ती ईश्वर निर्माण करतो. अशा लोकांच्या मनात पेरतो. म्हणून ही माणसे हनुमान आणि वानरांसारखी रामासाठी लढतात. हनुमान आणि सीता, वानर आणि सीता यांचे काहीच नातेसंबंध नव्हते. ओळख सुद्धा नव्हती. काही देणार, कि घेणार असाही करार नव्हता. तरीपण लढत होते. ही बुद्धी, ही निती, ही प्रवृत्ती समाज, धर्म टिकवून ठेवते. समाजाचे, धर्माचे वहन करते.
जरी कोणी मधेच जन्माला आला रावण, जरासंध, कंस, हिटलर तो समाजातील सत प्रवृत्ती,धर्मातील संकेतांचा गैरफायदा घेतो.मुर्ख लोक याला बळी पडतात. त्यांना आजच्या भाषेत अंधभक्त म्हणतात.ज्यांचा आहार, निद्रा,भय आणि मैथून हाच हेतू असतो.असे अंधभक्त कितीही बहुसंख्य असले, प्रबळ असले तरीही त्यांचा नाश होतो.जसा कौरवांचा झाला होता. हेच तर भगवत गीतेत सांगितले आहे. अर्जुना तू लढ.मला धर्माचा नैतिक तोल सांभाळायचा आहे. म्हणून मी तुला मदत करतो. तू जिंकलास तरीही मला तुझ्या राज्यातील हिस्सा वाटा किंवा मेहनताना नको आहे. मी भाडोत्री काम करीत नाही. जसे आजचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, अधिकारी, पुढारी भाडोत्री काम करतात.कारण यांना कुठेतरी राज्यपाल किंवा कमीशन वर नेमणूक पाहिजे असते.अशी नेमणूक ना हनुमानाला हवी होती, ना वानरांना हवी होती,ना कृष्णाला हवी होती.
या प्रवचनातील, या निरूपणातील अर्थ ज्याला समजला, आवडला, मानवाला तोच खरा रामाचा भक्त, कृष्णाचा भक्त.नाहीतर अंगाला शेंदूर, कुंकू, राख चोपडून कोणी साधू संत होत नाही. जटा वाढवून ऋषी, महर्षी होत नाही. ती मानवाची , ईश्वराची आणि स्वताची दिशाभूल असते. मी तसा नसतांना लोकांना, ईश्वराला दाखवणे.

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
