– काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन व पत्रकार परिषदेद्वारे कारवाईची मागणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२० सप्टेंबर राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी महिला नगरसेविका मंगला मोकडे यांच्या कुटुंबीयांशी चौकशीदरम्यान अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ व गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तसेच १४ वर्षीय मुलीच्या बेपत्ता प्रकरणात तिच्या विधवा आईला समाधानकारक माहिती न देता अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचाही आरोप असून, या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीने राजुरा ठाणेदार नितीन चिंचोळकर यांचेमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा महिला काॅग्रेस अध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन योगेश पाटील यांची चौकशी करून निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर कुणाल मोकडे यांना चौकशीसाठी राजुरा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कुणाल च्या विनंतीवरून राजुरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष हरजितसिंग संधू हे दुपारी १ ते ३ च्या दरम्यान विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी अरेरावीची भाषा करून राजकीय नेत्यांना घाणेरडी शिवीगाळ केली आणि कुणाल मोकडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, १८ ऑगस्ट २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या १४ वर्षीय हर्षाली सत्यपाल मोहुर्ले हिच्या बेपत्ता प्रकरणात तिची आई अश्विनी सत्यपाल मोहूर्ले यांनी तपास अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे मुलीबाबत चौकशी केली असता, समाधानकारक माहिती न देता त्यांच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलीच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत असलेल्या आईला संवेदनशीलतेने मार्गदर्शन व तपासाबाबत माहिती देण्याऐवजी गैरशब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामान्य नागरिक, विशेषतः महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, न्यायाच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात येतात. अशा वेळी त्यांच्याशी संवेदनशील, सन्मानपूर्वक आणि कायदेशीर पद्धतीने वागणे अपेक्षित असताना गैरवर्तनाचे आरोप होत असतील, तर त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत ॲड. कुंदा जेनेकर यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपांची सत्यता तपासावी, दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर तसेच विभागीय कारवाई करावी आणि अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास गांभीर्याने व तत्परतेने करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात योगेश पाटील यांचेवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिला काॅग्रेस ने पत्रकार परिषदेत दिला. या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच राजुरा पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. महिला काॅग्रेसने पत्रकार परिषदेत योगेश पाटील यांचेवर निलंबनाची कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिली आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर, हरजीतसिंग संधू, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आसिफ सैय्यद, संतोष देरकर, प्रणय धोटे, भाजप नगरसेवक भुपेश मेश्राम, नगरसेवक एजाज अहमद, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, नगरसेवक संध्या चांदेकर, पुनम गिरसावळे, अन्नु संधु, निता बानकर, फरीना सय्यद, मंगला मोकडे, पोर्णिमा सोयाम, संगीता धोटे, सुमित्रा कुचनकर, मंगला हांडे, प्रणय लांडे, मधुकर झाडे, संघपाल देठे यासह शहरातील महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोट राजुरा पोलिस ठाण्यात घरगुती प्रकरणावरून सासू मंगला मोकळे व त्यांच्या सुनेच्या परस्परांविरुद्ध तक्रारी आल्या होत्या. त्याबद्दल दोन्हीं बाजूंवर अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. पती – पत्नीतील वाद असल्याने प्रकरण बल्लारपूर येथे महिला समितीकडे पाठवित आहे. कुणाल मोकळे याला मारहाण केल्याविषयी विचारणा केल्यावर कुणाल याने पोलिसांसमोर अरेरावीची भाषा केली. या प्रकरणी मा. जिल्हा पोलिस अधिक्षक यांना माहिती दिली काॅग्रेस पक्षाने दिलेले निवेदन पाठविण्यात येईल. मा. पोलिस अधिक्षक यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– नितीन चिंचोळकर पोलिस निरीक्षक, राजुरा.

