गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, संदल, धुमाल व ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध – पोलीस स्टेशन पवनीचे आवाहन

HomeNewsनागपुर डिवीजन

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, संदल, धुमाल व ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध – पोलीस स्टेशन पवनीचे आवाहन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पवनी हद्दीत गणेश मंडळाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. सदर मिरवणुका शांततामय, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शासनाने निर्गमित केलेले आदेश, ध्वनी प्रदूषण, (नियमन व नियंत्रण) नियम तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व गणेश मंडळे, आयोजक, डीजे साऊंड सिस्टिम चालक व नागरिकांना बंधनकारक राहील. त्या अनुषंगाने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे, संदल, धुमाल अथवा कोणत्याही प्रकारच्या ध्वनीवर्धक साधनांचा वापर करून ध्वनी प्रदूषण होईल अशा पद्धतीने आवाज करणे प्रतिबंधित राहील. गणेश मंडळांनी तसेच मिरवणूक आयोजकांनी पुढील सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे.

विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे, संदल, धुमाल अथवा मोठ्या आवाजातील ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करू नये, शासनाने व सक्षम प्राधिकार्‍यांनी निर्धारित केलेल्या ध्वनी प्रदूषणासंबंधी नियमांचे पालन करावे, मिरवणुकी दरम्यान नागरिक महिला जेष्ठ नागरिक लहान मुले विद्यार्थी रुग्ण तसेच परिसरातील रहिवाशांना त्रास होईल अशा प्रकारचे ध्वनी प्रदूषण करू नये, डिजे साऊंड सिस्टीम चालकांनी गणेश मंडळाच्या परवानगीचा आधार घेऊन नियमबाह्य पद्धतीने ध्वनीवर्धक यंत्रणा वापरू नये, मिरवणुकीमध्ये शांतता कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे, पोलीस प्रशासनाने दिलेल्या मिरवणूक मार्ग, नियमांचे वेळ व इतर सूचनाचे सर्व मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करून डीजे संदल धुमाल अथवा मोठ्या आवाजाची ध्वनीवर्धक यंत्रणा आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
पोलीस प्रशासनाचे आवाहन आहे की श्री गणेशोत्सव हा भक्ती सामाजिक सलोखा व शांतता उत्सव म्हणून साजरा करावा सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून गणेश विसर्जन मिरवणुका शांततामय व पर्यावरण पूरक पद्धतीने पार पाडाव्यात असे आवाहन पवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी केलेले आहे.

You cannot copy content of this page