गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) – अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समिती आक्रमक; दोषींवर कारवाईची मागणी
संग्रामपूर (बुलढाणा) : वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला ग्रामसेवकाने मारहाण केल्याच्या कथित घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, आपले कर्तव्य बजावत असताना त्याच्यावर अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. संबंधित घटनेची प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
या निषेधाच्या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, उपाध्यक्ष दीपक मोहिते (अहिल्यानगर), कार्याध्यक्ष असलम शेख (रत्नागिरी), बाबासाहेब कांबळे (सांगली), प्रकाश गायकवाड (लातूर), पोपटराव भिसे (खंडाळा), अंकुश भिसे (फलटण) तसेच दिपाली वाघमारे (सांगली) यांनी घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले , “प्रशासकीय अधिकाऱ्याने कायदा हातात घेणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पत्रकारांना खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवून दबाव आणण्याचे तसेच प्रसंगी मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.”
“ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी आहेत, या गोष्टी अशा कायदा हातात घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विसरू नये, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढा देत राहू,” असा इशाराही मोहिते यांनी दिला.
पत्रकाराला मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात पत्रकारांना वार्तांकन करताना संरक्षण मिळावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीने केली आहे.

