विनर सोशल क्लब, सोनुर्ली येथे धाड; ६ लाख ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गौतम नगरी चौफेर – बादल बेले राजुरा , दि.२१ सप्टेंबर तालुक्यातील सोनुर्ली येथे सुरू असलेल्या कथित अवैध जुगार अड्ड्यावर राजुरा पोलिसांनी कारवाई करत मोठा जुगार उधळून लावला. या कारवाईत एकूण ४० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ६ लाख ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस प्रेसनोटनुसार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांना सोनुर्ली येथील विनर सोशल क्लब येथे नियमबाह्य पद्धतीने जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान क्लबमध्ये ५२ ताशांच्या पत्त्यांवर जुगार खेळताना एकूण ३९ आरोपी आढळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, ताशांचे पत्ते, ताश पत्त्यांचे बॉक्स, जुगाराचे आकडे लिहिलेले दस्तऐवज, मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, जुगारासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे कॉईन तसेच पेन-पॅड आदी साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ६,७६,४७० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन विरूर अप क्र. २०२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ सहकलम ३३(x), १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सपोनि गायकरवाड, पोउपनि श्यामसुंदर सूर्यवंशी, पोउपनि उमेश जोगदंड, पोलीस कर्मचारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
अवैध जुगार व तत्सम गैरप्रकारांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

