राजुरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून ‘पाणीचोरी’चा गंभीर आरोप

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून ‘पाणीचोरी’चा गंभीर आरोप


सास्ती परिसरातील कथित अवैध जोडण्यांमुळे लाखोंच्या महसुलावर गदा?
नगरसेवक एजाज अहमद यांची निष्पक्ष चौकशी, फौजदारी गुन्हे व संशयित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि.८ जुलै नगरपरिषदेच्या कोलगाव येथून सास्ती परिसरातुन राजुरा येणाऱ्या पाणीपुरवठा यंत्रणेतून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरसेवक एजाज अहमद यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अथवा संगनमताने सहभागी असल्याचा संशय असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवकांनी केलेल्या आरोपानुसार, सास्तीगावातील पोलीस चौकी पॉईंट, रामनगर कॉलरी येथील वेकोली मॅगझिन परिसर, जुना दवाखाना परिसर तसेच सास्ती गावातील चिकन मार्केट पॉईंट या विविध ठिकाणी नगरपरिषदेच्या मुख्य पाईपलाईनवरून कथितरीत्या बेकायदेशीर जोडण्या घेऊन पाण्याचा उपसा केला जात आहे. हा केवळ महसुली तोटा नसून सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर, नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर अतिक्रमण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक हिताला धक्का देणारा गंभीर प्रकार मानला जात आहे. नगरसेवकांचा दावा आहे की, या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरील वीजबिल, मोटारपंपांची देखभाल, दुरुस्ती, पाईपलाईनचे व्यवस्थापन तसेच इतर सर्व खर्च नगरपरिषद, राजुरा उचलत आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक सुविधेचा कथित बेकायदेशीर लाभ काही व्यक्ती किंवा भागांना मिळत असेल, तर त्याची आर्थिक जबाबदारी अखेरीस सर्वसामान्य नागरिकांवरच येते. त्यामुळे या आरोपांची केवळ कागदोपत्री चौकशी न होता प्रत्यक्ष घटनास्थळी संयुक्त पाहणी, तांत्रिक तपासणी आणि संपूर्ण पाईपलाईनचे ऑडिट होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक स्तरावरही व्यक्त होत आहे.
या कथित प्रकाराची तातडीने दखल घेत नगरपरिषद, राजुरा येथील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुमेध खापर्डे यांनी प्रत्यक्ष तपासणी करून अवैध जोडण्या असल्यास त्या तत्काळ तोडाव्यात, तसेच भविष्यात अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत पडताळणी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, नगरपरिषदेतील काही अधिकारी व कर्मचारी यांचा या कथित पाणीचोरीत सहभाग असल्याची माहिती मिळाल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. हा दावा सिद्ध झाल्यास प्रकरणाचे स्वरूप अधिक गंभीर ठरू शकते. सार्वजनिक यंत्रणेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनीच नियमांचे उल्लंघन करून अथवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अशा प्रकारांना संरक्षण दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर विभागीय चौकशीबरोबरच संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाईची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोपांची निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यावर आधारित चौकशी करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

“संबंधित विभागप्रमुखांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले किंवा योग्य ती कारवाई केली नाही, तर मला जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करून न्याय मागावा लागेल.” —नगरसेवक , एजाज अहमद

सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील कोणतीही कथित अनियमितता ही केवळ महसुलाचा प्रश्न नसून नागरिकांच्या मूलभूत गरजांशी निगडित बाब आहे. पाणीटंचाईच्या काळात राजुरा वासियांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असताना, सार्वजनिक पाईपलाईनवरून कथितरीत्या अवैध पाणी उपसा होत असल्याचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जात आहेत. अशा आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे ही प्रशासनाची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे.

You cannot copy content of this page