– आदर्श शाळेचा अभिनव उपक्रम.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.८ जुलै बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार जनजागृतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काउट्स-गाईड्स तसेच कब-बुलबुल युनिटच्या विद्यार्थ्यांनी “I SUPPORT SIR” अशी आकर्षक विद्यार्थी साखळी तयार करून शुद्ध मतदार यादी व सक्षम लोकशाहीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी, मतदार यादीतील माहिती अचूक ठेवण्याचे महत्त्व, लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि जबाबदार मतदानाची गरज याबाबत प्रभावी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी साखळी तयार करून “I SUPPORT SIR” हा संदेश देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या आगळ्यावेगळ्या विद्यार्थी साखळीने शाळा परिसरात लोकशाहीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण केले.
यावेळी राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी शुद्ध व अद्ययावत मतदार यादी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे ही लोकशाहीच्या बळकटीची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांमध्ये व समाजात याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी पार पाडावी.
कार्यक्रमास आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका तसेच राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काउट्स-गाईड्स आणि कब-बुलबुल युनिटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जनजागृती उपक्रम प्रभावी व प्रेरणादायी ठरला असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याकरिता ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, विवेक चौधरी, मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा, दिगंबर बल्की, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, गजानन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग राजुरा, चंद्रकांत भगत, स्काउट्स चंद्रपूर जिल्हा संघटक, दिपा मडावी गाईड्स चंद्रपूर जिल्हा संघटिका यांचे मार्गदर्शन लाभले.

