भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी तालुका) – कोरपना नगरपंचायतीतील कचरा व्यवस्थापन, सफाई कामगारांचे शोषण व वेतनातील कथित अनियमितता यासह विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्वर्गीय राजीव गांधी चौक, कोरपणा येथे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आंदोलनकर्त्यांनी कचरा व्यवस्थापनातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी केली. तसेच सफाई कामगारांच्या वेतनाबाबतही गंभीर आरोप करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सफाई कामगारांना शासनाच्या नियमानुसार मिळणारे वेतन सुमारे २० ते २४ हजार रुपयांच्या आसपास असताना प्रत्यक्षात काही कामगारांना केवळ १० हजार रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय कामगारांना पीएफचा लाभही मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन अनेक वर्षे झाली, मात्र सफाई कामगारांच्या प्रश्नांचा ‘घोडगंधा’ अद्याप संपलेला नाही, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. नाली साफ करणाऱ्या, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या गरीब कामगारांच्या हक्कांवर अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही, असा इशारा उपस्थितांनी दिला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत सफाई कामगारांना न्याय मिळत नाही आणि संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली, किशोर बावणे, सुनील दरेकर, अमोल आसेकर, जोशना वैरागडे वर्षा लांडगे सविता तुमराम नगरसेविका इंदिरा कोल्हेपवन बुरेवार मोहब्बत खान संभा भुसारी विजय पानघाटे उमेश पालीवार विनोद कुमरे सुमित वैरागडे अभय डोहे हरबा झाडे विजय जिवने मोबिन बेग गौरव मेश्रामयांच्यासह सफाई कामगारकार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांनी सफाई कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देत, “न्याय मिळेपर्यंत आम्हीही स्वस्थ बसणार नाही; सफाई कामगारांच्या लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” अशी भूमिका व्यक्त केली.
आता नगरपंचायत प्रशासन या आरोपांची दखल घेऊन चौकशी करणार का आणि सफाई कामगारांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेणार, याकडे कोरपणा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

