बंजारा समाज बांधवांना मोठा दिलासा; चालक-वाहकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार.
गौतम नगरी चौफेर राजुरा, दि.७ नोव्हेंबर बंजारा समाजबांधवांसाठी आनंद व दिलासा देणारी बससेवा सुरू झाली. राजुरा बसस्थानक येथून दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ पासून पोहरादेवी येथे जाण्यासाठी दररोज नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी ९ वाजता राजुरा बसस्थानकातून ही बस पोहरादेवीकडे रवाना होणार आहे.
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान व महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने या बससेवेचा समाजातील भाविकांना मोठा लाभ होणार आहे. विशेषतः पोहरादेवी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच सर्वसामान्य भाविकांची प्रवासाची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी पोहरादेवी येथे जाण्यासाठी करावा लागणारा प्रवासाचा त्रास आता कमी होणार असून, थेट बससेवा उपलब्ध झाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या बससेवेच्या प्रारंभानिमित्त बसचे चालक व वाहक संतोष जाधव, राकेश पुरटकर, मनोज कोडापे, नाणे, चंद्रपूर आगाराचे चालक वाहक राठोड, चव्हाण यांचे बंजारा समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी गणपत चव्हाण, नामदेव जाधव, संतोष जाधव, रविंद्र पवार, राकेश गोनलवार यांच्यासह बंजारा समाजातील अनेक बांधव उपस्थित होते. बंजारा समाजाच्या धार्मिक भावना व प्रवासाची गरज लक्षात घेऊन सुरू झालेली ही बससेवा समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे राजुरा व परिसरातील बंजारा समाज बांधवांना पोहरादेवीच्या दर्शनासाठी नियमित आणि सुलभ प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. या बससेवेबद्दल समाज बांधवांनी समाधान व्यक्त करून परिवहन विभागाचे आभार मानले.

