गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२७ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजुरा शहरात बाहेरगावाहून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना वेळेवर सायंकाळचे जेवण मिळावे, या सामाजिक भावनेतून रोटरी क्लब राजुरातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जेवणाचे डबे व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी रोटरी क्लब राजुरातर्फे पोलिस निरीक्षक, पोलीस स्टेशन राजुरा यांना रीतसर पत्र देऊन बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची संख्या व त्यांची ठिकाणे याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर रोटरी क्लबच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेत प्रत्येक पोलीस बांधवापर्यंत त्यांच्या बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या पोहोचविण्याचे कार्य केले.

या उपक्रमाचे नेतृत्व रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे यांनी केले. क्लबचे सचिव किशोर हिंगाणे, माजी अध्यक्ष कमल बजाज, निखिल चांडक, सारंग गिरसावळे, अॅड. जीवन इंगोले, तसेच संचालक सुबोध डाहुले, विनोद चने, अमोल कोंडावार, नितेश गिरडकर, किरण ढुमणे, दमयंती इंगोले, पुनम गिरसावळे केडी फूड जंक्शन चे व्यवस्थापक बबलू बघेल यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला. गणेश विसर्जनाच्या काळात पोलीस बांधव आपल्या कर्तव्यावर तैनात असताना त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा रोटरी क्लबचा हा उपक्रम माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्याप्रती कृतज्ञतेचा आदर्श संदेश देणारा ठरला. या उपक्रमाबद्दल पोलिस निरीक्षक राजुरा तसेच बंदोबस्तासाठी आलेल्या संपूर्ण पोलीस बांधवांनी रोटरी क्लब राजुराचे आभार व्यक्त केले.

