– तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप; ‘महिलेचे दुःख महिला अधिकारी समजून घेणार नसतील तर न्याय कोण देणार?’
गौतम नगरी चौफेर शिला धोटे कोरपणा – पोलीस ठाण्यात न्यायाच्या अपेक्षेने गेलेल्या एका महिलेची कथितरित्या फरफट झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी महिलेला रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करायला लावून ‘उद्या या’ असे सांगून परत पाठवण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा तिचा दावा आहे.

संबंधित महिला आपल्या तक्रारीवर पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी, या अपेक्षेने २३ सप्टेंबर रोजी कोरपणा पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा दावा महिलेने केला आहे.
‘सामान्य महिलांनी दाद मागायची तरी कुठे?’
आपली व्यथा ऐकून घेऊन कायदेशीर मदत मिळावी, या अपेक्षेने पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेलाच जर तक्रार नोंदवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची कुठे? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
महिलेने संताप व्यक्त करताना, “एक महिला ठाणेदार दुसऱ्या महिलेचे दुःख समजून घेऊन तिची तक्रार नोंदवून घेणार नसेल, तर आम्हाला न्याय कोण देणार साहेब?” असा सवाल केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे, संबंधित महिलेची तक्रार नेमकी कोणत्या स्वरूपाची होती, ती तक्रार स्वीकारण्यात आली की नाही आणि त्यावर पोलिसांकडून कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत कोरपणा पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांची बाजूही महत्त्वाची असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

