माजी विद्यार्थिनी प्रांजली वेलादीची शाळेप्रती कृतज्ञता.- स्वकमाईच्या पहिल्या स्टायफंडमधून शाळेला १५ खुर्च्या व ४ ग्रीन मॅटची भेट.

HomeNewsनागपुर डिवीजन

माजी विद्यार्थिनी प्रांजली वेलादीची शाळेप्रती कृतज्ञता.- स्वकमाईच्या पहिल्या स्टायफंडमधून शाळेला १५ खुर्च्या व ४ ग्रीन मॅटची भेट.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १२ ऑगस्ट :विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. शाळेने दिलेल्या संस्कारांची आणि शिक्षणाची जाणीव ठेवत माजी विद्यार्थिनीने आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी प्रांजली आशा हिराजी वेलादी हिने परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय पदवीधर होण्याचे यश संपादन केले आहे. किरकिझस्थान येथील ओश स्टेट विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने भारतात येऊन आपल्या शाळेला सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रांजली वेलादी हिने आपल्या स्वकमाईच्या पहिल्या स्टायफंडमधून शाळेसाठी १५ खुर्च्या आणि ४ ग्रीन मॅट भेट दिल्या. आपल्या यशात शाळेचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त करत तिने ही भेट दिली. तिच्या या कृतज्ञतापूर्वक उपक्रमाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले.
प्रांजली हिने प्राथमिक शिक्षण आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे घेतले. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केले. किरगिझस्थान येथील ओश स्टेट विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या निवासस्थानी शिक्षक बादल बेले व सुवर्णा बेले यांनी भेट देऊन शाळेच्या वतीने तिचा सत्कार केला होता. तिच्या या यशाबद्दल विविध मान्यवर व संस्थांच्या वतीनेही अभिनंदन करण्यात आले.
“ज्या शाळेने घडविले, त्या शाळेसाठी काहीतरी देणे ही माझी जबाबदारी आहे,” या भावनेतून प्रांजलीने केलेले हे कार्य इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
प्रांजलीच्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, शिक्षक, विद्यार्थी तसेच बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला प्रांजलीची आई – वडील उपस्थित होते.

You cannot copy content of this page