विद्यार्थ्यांनी केला बैलगाडीतून प्रवास.

HomeNewsनागपुर डिवीजन

विद्यार्थ्यांनी केला बैलगाडीतून प्रवास.

पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि.२ जून आधुनिक युगात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून प्रवास करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. शाळेत येतांना विद्यार्थ्यांनी आनंदाने बैलगाडीतून प्रवास करत पारंपरिक वाहतुकीचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलगाडी ही ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असून, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे उत्तम साधन आहे. विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून प्रवास करत पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि भारतीय ग्रामीण परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, आधुनिक वाहनांच्या गर्दीत बैलगाडीतून प्रवास करण्याचा अनुभव अत्यंत वेगळा आणि आनंददायी ठरला. या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीची ओळख नव्या पिढीला होत असून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणाही मिळते.
या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, पारंपरिक वाहतुकीचे जतन आणि ग्रामीण वारशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाली. बैलगाडीसारख्या प्रदूषणमुक्त वाहतुकीचा वापर वाढल्यास पर्यावरण संवर्धनास निश्चितच हातभार लागेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. याकरिता राजुरा येथील रहिवासी रवींद्र बानकर यांनी आपली बैलगाडी उपलब्ध करुन दिली. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी त्यांचे आभार मानले.

    You cannot copy content of this page