नव्याने तयार झालेल्या राजुरा-बल्लारपूर महामार्गावर कचऱ्याचे साम्राज्य!

HomeNewsनागपुर डिवीजन

नव्याने तयार झालेल्या राजुरा-बल्लारपूर महामार्गावर कचऱ्याचे साम्राज्य!

– महामार्गालगत बिनधास्त कचरा टाकला जात असल्याने अपघाताचा धोका.

– कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.

गौतम नगरी चौफेर बांदल बेले राजुरा, दि.१९ नोव्हेंबर
राजुरा-बल्लारपूर नवीन महामार्गाचे काम आता गतीने सुरू असून या मार्गावरून नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे. अत्याधुनिक सुविधांसह तयार होत असलेला हा महामार्ग प्रवाशांसाठी सोयीचा ठरत असतानाच काही बेजबाबदार नागरिक आणि व्यावसायिकांकडून महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महामार्गाच्या सौंदर्याला बाधा आणण्याबरोबरच यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा दिशादर्शक फलकाजवळ महामार्गाच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यालगत प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे रिकामे पुडे, कागद, प्लास्टिकच्या बाटल्या तसेच उष्ट्या अन्नपदार्थांचा मोठा ढीग साचलेला छायाचित्रांतून दिसून येत आहे. नवीन महामार्गाच्या कडेला अशा प्रकारे कचरा फेकून परिसराचे विद्रूपीकरण केले जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि सुज्ञ नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाचा वापर आता अनेक नागरिक करू लागले आहेत. काही ज्येष्ठ नागरिक तसेच आरोग्याबाबत जागरूक असलेले नागरिक सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी या मार्गावर येत असतात.

अशा परिस्थितीत महामार्गालगत टाकलेल्या कचऱ्यातील उष्टे अन्न खाण्यासाठी मोकाट जनावरे आणि श्वान रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. अचानक जनावरे किंवा श्वान वाहनांसमोर आल्यास वाहनचालकांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार केवळ अस्वच्छतेचा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे.एकीकडे शासनाकडून स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसरासाठी विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे सार्वजनिक महामार्गालगत अशा पद्धतीने कचरा टाकणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. करोडो रुपये खर्च करून विकसित होत असलेल्या महामार्गाची देखभाल आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांचीही आहे. मात्र, काहींच्या बेजबाबदार वर्तनामुळे या सुंदर महामार्गाचे विद्रूपीकरण होत आहे. कचरा कोणाच्या हद्दीत? यापेक्षा कारवाई महत्त्वाची असून सदर कचरा टाकण्यात आलेला परिसर बामनवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो की राजुरा नगर परिषदेच्या हद्दीत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महामार्ग प्रशासनाने समन्वय साधून या प्रकाराची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. परिसरातील कचरा त्वरित हटवून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच महामार्गालगत कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक व कठोर कारवाई करावी. महामार्गाच्या कडेला कचरा टाकण्यास प्रतिबंध करणारे फलक लावावेत आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवीन महामार्ग हा विकासाचा मार्ग आहे, कचरा टाकण्याचे ठिकाण नव्हे! सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता तातडीने कारवाई करावी, अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

    You cannot copy content of this page