आमदार किशोर जोरगेवार यांची पत्रकार परिषदेत माहिती
गौतम नगरी चौफेर शिला धोटे चंद्रपूर, ता. २० चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर झालेला १०० कोटी रुपयांचा निधी परत जाणार नाही. या निधीतून नियोजित विकासकामे केली जाणार आहेत, अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर येथील दीक्षाभूमीच्या धर्तीवर चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्यात यावा, अशी मागणी आपण सातत्याने केली. यासाठी विधानसभेतही हा प्रश्न लावून धरला. मागील सहा वर्षापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी परत जाणार असल्याचा चुकीचा संभ्रम समाजात निर्माण केला जात असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या दुर्लक्षामुळे दीक्षाभूमीचा विकास खुंटल्याचा आरोप करीत मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर घोटेकर आणि खोब्रागडे असे दोन गट तयार झाले असून, या विषयावर काही जण समर्थनाची, तर काही जण विरोधाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात दोन्ही गटांकडे काही सूचना असल्यास त्यांचा विचार केला जाईल, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर झालेला १०० कोटी रुपयांचा निधी तीन टप्प्यांत उपलब्ध होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा मानस आहे. यासोबतच विहार, निवास व्यवस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीची भूमिका दीक्षाभूमीची देखभाल करण्यापुरती राहणार आहे. विकासकामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीचा उपयोग करून दीक्षाभूमीचा नियोजित विकास करण्यात येणार आहे. दीक्षाभूमी हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून लाखो अनुयायांसाठी प्रेरणास्थान आहे. या स्थळाचा सर्वांगीण विकास झाल्यास चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असेही आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेविका सविता कांबळे, रवी गुरुनुले, शीतल गुरुनुले, शेखर शेट्टी, बलराम डोडाणी, प्रकाश देवतळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱी उपस्थित होते
