आकर्षक वेशभूषेतून प्राचीन वारसाचे दर्शन; आमदार देवराव भोंगळे यांनी केले विशेष कौतुक.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१५ सप्टेंबर तान्हा पोळा हा केवळ पारंपरिक उत्सव न राहता नव्या पिढीला महाराष्ट्राची लोकपरंपरा, प्राचीन वारसा, भक्ती चळवळ इतिहास आणि सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देणारा उपक्रम म्हणून ओळखल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजुरा शहरातील हनुमान देवस्थान येथील तान्हा पोळ्याच्या स्पर्धेत कर्णव संदीप बानकर यांनी साकारलेली ‘माँ तुळजा भवानी’ ची आकर्षक वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. बालकांच्या वेशभूषेतून स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, समाजसुधारक, ऐतिहासिक, धार्मिक व पारंपरिक व्यक्तिमत्त्वांचे वेशभूषाद्वारे सादरीकरण करण्याची परंपरा महत्त्वपूर्ण मानली जाते. याच उद्देशाने राजुरा शहरातील पोस्ट ऑफिस जवळील निवासी ‘राणी वेशभूषा व रूपसज्जा स्टुडिओ’च्या माध्यमातून पारंपरिक स्वरूप, कलात्मक व लक्षवेधी वेशभूषा आणि आधुनिक रूपसज्जेचा सुरेख समन्वय साधत ‘माँ तुळजा भवानी’ची वेशभूषा साकारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला देखावा सादर करून विविध संदेश देऊन छ. शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा अधोरेखित करण्यात आला.

या आगळ्यावेगळ्या रूपसज्जेने व आकर्षक किल्ला देखावा ने तान्हा पोळा उत्सवातील आकर्षणात विशेष भर पडली. बालकांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीतील विविध रूपे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. या विशेष व लक्षवेधी वेशभूषेबद्दल आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, सतीश धोटे, ॲड.निनाद येरणे, डॉ.सुरेश उपगणलावार, सिद्धार्थ पथाडे , संदीप जैन, सुरेश रागीट यांच्या हस्ते कर्णव बानकर यांचा सत्कार करून कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी उपस्थितांनीही या अनोख्या वेशभूषेचे कौतुक केले. विशेष म्हणजे दरवर्षी विविध सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याची परंपरा संदीप बानकर आणि त्यांच्या परिवाराने सातत्याने जपली आहे.

फोटो- तान्हा पोळ्यानिमित्त साकारलेली ‘माँ तुळजा भवानी’ ची आकर्षक वेशभूषा बघतांना आमदार देवराव भोंगळे व इतर….
