HomeNewsनागपुर डिवीजन

चिमूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास करा; सुविधा नसतील तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

गौतम नगरी चौफेर चिमूर – चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि सुरक्षित शिक्षण मिळावे, यासाठी शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचा सर्वंकष आढावा घेऊन तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच समान शैक्षणिक संधी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित व सुसज्ज इमारत, पुरेशा वर्गखोल्या, स्वच्छ पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालये, वीज, पंखे, संगणक, इंटरनेट, स्मार्ट क्लास, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य आणि सुरक्षित शालेय परिसर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
यासोबतच शाळांमध्ये पुरेसे व गुणवत्तापूर्ण शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष, डिजिटल शिक्षण, कला-क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन यावरही विशेष भर देण्यात यावा.
शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करावा चिमूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची प्रशासनामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक शाळेतील उपलब्ध आणि अपूर्ण सुविधांचा स्वतंत्र अहवाल तयार करावा. कोणत्या शाळेत कोणती सुविधा नाही, त्यासाठी किती निधी आवश्यक आहे आणि किती कालावधीत ती सुविधा उपलब्ध करून देता येईल, याचे स्पष्ट नियोजन करण्यात यावे.
सुविधा नसतील तर जबाबदारी निश्चित करा
शाळांसाठी निधी उपलब्ध असूनही सुविधा निर्माण करण्यात दिरंगाई होत असेल, कामे निकृष्ट दर्जाची असतील किंवा संबंधितांकडून निष्काळजीपणा झाल्याचे आढळून आले तर केवळ कागदोपत्री अहवाल घेऊन प्रकरण बंद करू नये. संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
तसेच मंजूर निधीचा गैरवापर, अनियमितता किंवा कामांमध्ये गैरप्रकार आढळल्यास चौकशी करून दोषींवर वसुलीसह नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नको
ग्रामीण भागातील विद्यार्थी गरीब किंवा शेतकरी कुटुंबातील आहेत म्हणून त्यांना शिक्षणाच्या सुविधा कमी मिळणे योग्य नाही. चिमूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पाया आहे. त्यामुळे शाळांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.
त्यामुळे चिमूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठोस मागणी शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
मागणी करणारे :
अशोक चौधरी
उपसरपंच, ग्रामपंचायत शंकरपूर
ता. चिमूर, जि. चंद्रपूर

You cannot copy content of this page