राजुरा–आसिफाबाद व राजुरा–आदिलाबाद मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा–आसिफाबाद व राजुरा–आदिलाबाद मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २९ जुलै राजुरा नगर परिषद हद्दीतील राजुरा–आसिफाबाद व राजुरा–आदिलाबाद या मुख्य महामार्गांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. याबाबत नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष दिलीप मुरलीधर डेरकर यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अतिक्रमण हटविण्याची कारवाई यापूर्वी अनेकदा करण्यात आली असली तरी काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला जातो. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका कायम आहे.
विशेष म्हणजे, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, राजुरा समोरील अतिक्रमण हटविण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यानंतरही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सूचना व निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या अतिक्रमण हटविण्याबाबतच्या आदेशांचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजुरा–आसिफाबाद व राजुरा–आदिलाबाद मुख्य महामार्गावरील तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयासमोरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अनेक नगरसेवकांनीही स्वाक्षरी करून या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

You cannot copy content of this page