गौतम नगरि चौफेर (नांदा फाटा):- गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच सदर कार्यक्रमाला गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रा. आशिष पैनकर, ग्रंथालय विभागाचे प्रा. सचिन कर्णेवार यांची देखील उपस्थिती होती.
सुरुवातीला प्रतिमापूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. यानंतर झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संत गाडगेबाबा हे जिथे जात असत, तिथला परिसर स्वच्छ करत असत. आपल्या कीर्तनाद्वारे ते लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्व इत्यादी विषयांवर अगदी सोप्या भाषेत लोकांशी संवाद साधून त्यांना अत्यंत चांगले मार्गदर्शन करीत असत. त्यामुळे लोकांनी त्यांना संत ही उपाधी दिली होती. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी सुद्धा संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराज यांचे कार्य इतके मोठे होते की आज मोठमोठ्या विद्यापीठांनादेखील त्यांची नावे दिलेली आहे, असे उद्गार डॉ. राजेश डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. आशिष पैनकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS