राजुरा – तेलंगाना मार्गावर कारचा भीषण अपघात.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा – तेलंगाना मार्गावर कारचा भीषण अपघात.

– सोंडो जवळील पुलावरून कार पडली खाली. माय लेकीसह अन्य दोन महिलांचा मृत्यू ; मृतांचा आकडा चार.
– जखमींवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.

गौतम नगरी चौफेर (सौ,सुवर्णा बादल बेले राजुरा) – २५ डिसेंबर तेलंगाना राज्यातील कागजनगर येथील निजामुद्दीन कॉलनीतील रहिवासी असलेल्या मृतक व जखमी हे सर्व नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीची प्रकृती बघायला दिनांक २४ डिसेंबर ला किरायाने गाडी करून गेले होते. बहिणीची प्रकृती बघून ते सर्व दिनांक २५ डिसेंबर ला नागपूर येथून कागजनगर कडे आपल्या घरी परतत असताना राजुरा -तेलंगाना मार्गावर सोंडो गावा जवळील पुलावरून रात्री एक वाजताच्या दरम्यान गाडी पुलावरून खाली पडली. यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.

तर अन्य पाच जणांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात एकाच घरातील माय लेकींचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये (आई) सलमा बेगम (४५), (मुलगी)अक्सा शबरीन (१२) या मायलेकी आहेत तर अफजल बेगम (६०), साहिरा बेगम (४२), यांचा समावेश आहे तर गंभीर जखमी असलेल्या नुसरत बेगम (४८), नजहत बेगम (५०), शाहीन निशा (३७), अब्दुल अरहान (७) , व गाडी चालक अब्दुल रहमान यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. आर्टिगा गाडी क्रमांक TS ०२ EN ५५४४ या गाडीने भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटना स्थळ गाठून अपघातातील जखमी व मृतांना राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. गाडी चालक अब्दुल रहमान यांच्यावर २८१,२२५ (ब),१०६ (१), BNS सह कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
———————————————
या भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू.
       मृतक सलमा बेगम (४५) ही गृहिणी होती. तर अक्सा शबरीन (१२) ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. मृत्यू पश्चात कुटुंबात वडील ऑटो चालक असून एक भाऊ बी. कॉम. द्वितीय वर्षात शिकत आहे. बहिणीची प्रकृती बघून नागपूर वरून घरी परत येताना काळाने अचानक घाला घातला आणि यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
———————————————
राष्ट्रीय महामार्गावरील ढिसाळ नियोजनाचे ठरत आहे बळी.
       दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महा मार्गाचे कामं दिवस रात्र सुरू आहे. परंतु कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनाचे प्रवासी बळी ठरत आहेत. रस्त्यांवर योग्य दिशादर्शक फलक नाहीत, कुठेही कसंही काम सुरू असते, धुळीने तर मागचे पुढचे काहीच दिसत नाही, कित्येकदा मोठमोठ्या मशिनीमुळे वाहतूक व्यवस्थेची कोंडी होते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याची मर्यादा ठरविणारे फलक किंवा सीमांकन नसल्याने अनेकदा वाहतुकीचा रस्ता लक्षात येत नाही. या राष्ट्रीय महामार्ग बांधकामात कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. तर कंत्राटदार मनमर्जी कामं करीत असल्याने सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
———————————————

COMMENTS

You cannot copy content of this page