– महावितरणकडून तातडीने उपाययोजनांची मागणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.११ जुलै राजुरा शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बरेचदा दर पंधरा मिनिटांनी ते अर्ध्या तासाने वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, कमी व्होल्टेजच्या समस्येमुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाजावरही मोठा परिणाम होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक भागात वीजपुरवठा अत्यंत अनियमित झाला आहे. सततच्या लोडशेडिंगसदृश परिस्थितीमुळे विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कार्यालये तसेच लघुउद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमी व्होल्टेजमुळे पंखे, फ्रिज, एसी, मोटारपंप आणि इतर विद्युत उपकरणे सुरळीत चालत नसल्याने उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
याशिवाय अनेक नागरिकांनी सौरऊर्जा (सोलर) प्रणालीच्या उत्पादनावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सोलर प्रणालीचे अपेक्षित उत्पादन कमी होत असून, त्याचा परिणाम वीज बिलावरही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्येबाबत लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील वीज वितरण व्यवस्था मजबूत करणे, तांत्रिक बिघाड त्वरित दूर करणे आणि कमी व्होल्टेजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन राजुरा शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमागील कारणांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.