उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव कंटेनरचा कहर; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

HomeNewsनागपुर डिवीजन

उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव कंटेनरचा कहर; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

– अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला

– शहरातील ढासळलेल्या वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गौतम नगरी चौफेर
राजुरा, ता.प्र. –
राजुरा शहरातील असिफाबाद रोडवरील शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोर शनिवारी, दिनांक ११ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने विरूर स्टेशन येथील विशाल केशव जीवतोडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विशाल जीवतोडे हा एमएच-३४/बीजे-११३३ क्रमांकाच्या दुचाकीने तहसील कार्यालयाकडून पंचायत समितीकडे जात असताना मागून भरधाव आलेल्या केए-६३/ए-६७६८ क्रमांकाच्या दहा चाकी कंटेनरने दुचाकीच्या हँडलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी सुमारे पंधरा फूट पुढे फेकली गेली, तर विशाल कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडला. डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला कंटेनर नागरिकांनी पंचायत समिती परिसरात अडवून पोलिसांच्या स्वाधीन केला. राजुरा पोलिसांनी कंटेनर जप्त करून चालक कमलेश भोजराज गुर्जर (वय २५, रा. नंदराई, राजस्थान) याला अटक केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
विशाल जीवतोडे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. विरूर स्टेशन येथे त्याचा केटरिंग व्यवसाय असून कामानिमित्त तो राजुरा येथे आला असताना काळाने त्याच्यावर घाला घातला.
या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.

    वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा; आणखी किती बळी जाणार?
    राजुरा शहरात वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पथद्विभाजक, रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले गट्टू आणि अरुंद झालेला मुख्य मार्ग यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच शहरातून भरधाव वेगाने अवजड वाहनांची सततची वर्दळ सुरू असून, त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. उपजिल्हा रुग्णालयासमोर अल्पावधीत घडलेला हा दुसरा गंभीर अपघात असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.


    अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर तहसील कार्यालयाच्या मैदानात आणत असताना चालकाने प्रवेशद्वारावरील लोखंडी कमानीलाही जोरदार धडक दिल्याने ती कोसळली. या घटनेचीही स्वतंत्र नोंद होणार का आणि संबंधितावर अतिरिक्त कायदेशीर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    You cannot copy content of this page