गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार गडचांदूर) कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील गडचांदूर येथील पोलीस स्टेशन गडचांदूर यांच्या वतीने शनिवार, दि. 18 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्वेच्छिक रक्तदान शिबिराला नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जीवन ज्योती ब्लड सेंटर, नागपूर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात एकूण 21 जणांनी रक्तदान करुन मानवतेचा विषयी अनोखा संदेश दिला.

या शिबिरामध्ये गडचांदूर पोलीस स्टेशनचे 7 पोलीस कर्मचारी तसेच पोलीस हद्दीतील 14 नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत रक्तदात्यांनी अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच जीवन ज्योती ब्लड सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रक्ताची गरज कोणत्याही क्षणी कोणालाही भासू शकते. अशा वेळी स्वेच्छेने केलेले रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“रक्तदान – मानवतेची सर्वात मोठी सेवा” या संदेशाने संपन्न झालेले हे शिबिर सामाजिक सेवेचा आदर्श ठरले.
