गौतम नगरी चौफेर – आज दिनांक 11 जुलै २०२६ रोज शनिवारला सकाळी 8.00 वाजता शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्या पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सभेला उपस्थित होते या सभेला अध्यक्ष प्राचार्य श्री एम.एस. ताजने व प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे शिक्षण तज्ञ रत्नाकरजी डांगे , भद्रावती पंचायत समितीचे विशेष शिक्षक श्री मोहन सर व चोरा येथील पोलीस पाटील श्री सागर सगुर्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील वर्षीची शाळा व्यवस्थापन व विकास समिती बरखास्त करून नव्याने ही समिती पुनर्गठीत करण्यात आली. तसेच याच सभेतून माता पालक व महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. शिक्षक पालक सभेला बहुसंख्य पालक व माता पालक उपस्थित होते.
प्राचार्य एम एस ताजने यांनी या सर्व समित्यांचे उद्देश व विद्यार्थी व शाळेच्या प्रगती साठी समितीचे महत्त्व सभेला पटवून दिले. समितीने कोणते कार्य करावे याची जाणीवही करून देण्यात आली. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले . शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्य करणारे विद्यालयातील कर्मचारी श्री राजू इंगुलकर, प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी घोडे यांनी केले प्रास्ताविक प्रा.श्री डी.एम. पुसदेकर यांनी केले. शाळा व्यवस्थापन व विकास समिती स्थापन करण्यास श्री एच टी येलकर यांनी कार्य केले तर महिला तक्रार निवारण समिती व माता पालक समिती करिता कुमारी एस डब्ल्यू कोडापे यांनी काम केले. एक पेड मा के नाम उपक्रम अंतर्गत शाळेच्या पटांगणात पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन श्री जे.जी. भगत यांनी केले व सर्व पालकांना अल्पोपहार देऊन सभेची सांगता करण्यात आली.

