गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१ जुलै भारत स्काउट्स आणि गाईड्स चंद्रपूर कार्यालयाच्या आवाहनानुसार आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे १ जुलै रोजी कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या स्काउट्स-गाईड्स व कब-बुलबुल युनिटच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. कृषी दिनाचे महत्त्व, शेतीचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमाला नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, बादल बेले, स्काउट्स मास्टर, रोशनी कांबळे, गाईड कॅप्टन तसेच सुनीता कोरडे व अर्चना मारोटकर, कब-बुलबुल युनिट लीडर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन स्काउट्स- गाईड्स व कब-बुलबुल युनिटच्या सहकार्याने करण्यात आले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


