गौतम नगरी चौफेर राजुरा:
राष्ट्रीय सेवा योजना पथक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर तथा पतंजली योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार आज सकाळी ६.३० ते ८.०० या दरम्यान महाविद्यालयाच्या सभागृहात बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केल्यानंतर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योग दिन साजरा करणे सुरू झाले. यावर्षीच्या योग दिनाची भारत सरकारने “निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही संकल्पना ठेवलेली आहे.
याप्रसंगी योग प्रशिक्षक म्हणून सौ. सुनीता जमदाडे, श्री. पी.एस. उराडे, सौ. सुरेखा उराडे व पतंजली योग समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून उपस्थिताना योगाचे धडे व योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. अविनाश जाधव, राजूरा बार असोशिएशन चे माजी अध्यक्ष अॅड मा. अरुण धोटे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, शिवाजी हायस्कूल राजूरा चे मुख्याध्यापक श्री खामनकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा समन्वयक प्रा. गुरुदास बल्की तसेच राजुरा शहरातील मान्यवर, महाविद्यालयातील संपूर्ण कर्मचारी, रासेयो चे स्वयंसेवक, NCC चे सर्व कॅडेट या प्रसंगी उपस्थित राहून योगाचे धडे घेतले. योग प्रात्यक्षिके झाल्यानंतर NCC तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमाखाली महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रा. गुरुदास बल्की यांनी मानले.

