१६ वर्षांपासून नळ योजनेचा प्रश्न अनुत्तरित; आठ दिवसांत योजना सुरू करण्याची ग्वाही.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. : २३ ऑक्टोबर “लढेंगे जितेंगे!”, “अशा सरकारचं करायचं काय? खाली डोकं, वरती पाय!” अशा घोषणांनी पंचायत समिती राजुरा परिसर दणाणून सोडत पाण्याच्या प्रश्नावर सुकुडपल्ली येथील आदिवासी महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली. मागील तब्बल १६ वर्षांपासून गावातील नळ योजना बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवून गावातील नळ योजना सुरू करावी, अशी ठाम मागणी महिलांनी केली.

ट्रायबल डेव्हलपमेंट कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी आपल्या पाणी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत नळ योजना तातडीने सुरू करण्यासाठी निवेदन सादर केले.
आठ दिवसांत नळ योजना सुरू करण्याचे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी डॉ. भागवत रेजिवाड यांनी दिले. महिलांनी पंचायत समिती प्रशासनासमोर गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मांडला. तब्बल १६ वर्षांपासून नळ योजना बंद असतानाही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित संवर्ग विकास अधिकारी रेजिवाड यांनी येत्या आठ दिवसांत नळ योजना सुरू करण्याची ग्वाही दिली.

मात्र, आठ दिवसांत नळ योजना सुरू झाली नाही, तर पुन्हा पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला. यावेळी संवर्ग विकास अधिकारी यांनी शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन करत महिलांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात महिला-पुरुषांचा सहभाग या आंदोलनाच्या वेळी ट्रायबल डेव्हलपमेंट कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम मेश्राम, गाव कमिटीच्या अध्यक्षा निर्मला सांड्रा, सचिव शोभा मंडीगा, कार्यकर्ते सुरेश चिंतापुरी, अनिल चिंतापुरी, रेणुका कोडापे, सुनील आत्राम, रमेश चिंतापुरी, शिलाबाई सांड्रा, अनुसया टेकाम, विजया मंडिगा, ललिता सोयाम, लक्ष्मी आत्राम, सुमित्रा गंगुला यांच्यासह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.
आता प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या आश्वासनाची पूर्तता होते का, आणि सुकुडपल्ली गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

