– चिमुकल्या आदिव स्नेहल विकास डोकेची India Book of Records 2026 मध्ये दिमाखदार नोंद.
– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे गौरव.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा , दि. ५ ऑक्टोबर वय अवघे ६ वर्षे २५ दिवस, पण कामगिरी मात्र आकाशाला गवसणी घालणारी! गडचांदूर शहरातील चिमुकला आदिव स्नेहल विकास डोके याने आपल्या विलक्षण जिद्द, चिकाटी आणि सरावाच्या जोरावर तब्बल ६७७ कार्टव्हील्स पूर्ण करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे.
आदिव डोके याचा जन्म २८ जुलै २०२० रोजी झाला. त्याने टेरेसवर अवघ्या २० मिनिटे २ सेकंदांत ६७७ Cartwheels (हातावर तोल सावरत गोल गुलाटी) मारण्याचा पराक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची India Book of Records 2026 मध्ये अधिकृत नोंद झाली असून, २२ ऑगस्ट २०२६ रोजी हा विक्रम अधिकृतरित्या नोंदविण्यात आला.

इतक्या कमी वयात ६७७ वेळा कार्टव्हील्स करण्याची ही कामगिरी केवळ शारीरिक कसरत नसून, जिद्द, सातत्य, आत्मविश्वास, मेहनत आणि ध्येयासाठी झोकून देण्याची वृत्ती यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. आदिवच्या या उल्लेखनीय यशामुळे गडचांदूर शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आदिव डोके याचा भेटवस्तू, कुंडी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी अरुणा सालवटकर, कोरपना तालुका महिला अध्यक्षा, किरण अहिरकर, उपाध्यक्षा, सुलभा कुरेकर, सचिव, रंजना पवार, डॉ. विकास डोके, डॉ. स्नेहल डोके आणि सावी डोके यांची उपस्थिती होती.
आदिवच्या या उज्ज्वल यशाबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दीपक भवर, महासचिव आशिया रीजवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महिला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, सचिव पंडित काळे आदींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
चिमुकल्या वयात मोठे स्वप्न!

“वय लहान असले तरी जिद्द मोठी असेल, तर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते,” याची प्रेरणादायी प्रचिती आदिव डोकेच्या या विक्रमातून आली आहे. त्याच्या या यशाने इतर बालकांनाही मेहनत, सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर नवनवीन विक्रम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
