खड्ड्यांमुळे घरातील दिवे विझले; सरकारला जागे करण्यासाठी खड्ड्यांत विझलेले दिवे लावून निषेध

HomeNewsनागपुर डिवीजन

खड्ड्यांमुळे घरातील दिवे विझले; सरकारला जागे करण्यासाठी खड्ड्यांत विझलेले दिवे लावून निषेध

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : तालुक्यातील विविध मार्गांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे अनेक कुटुंबातील घरचे दिवे कायमचे विझले आहेत. या जीवघेण्या खड्ड्यांच्या विरोधात आजपर्यंत अनेकदा निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली. मात्र, वारंवार मागणी करूनही शासन-प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. ज्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आणि अनेक घरांतील दिवे विझले, त्याच खड्ड्यांमध्ये विझलेले दिवे लावून शासनाचा निषेध करण्यात आला.“आम्ही वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली, रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली; मात्र अद्यापही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही. आणखी किती अपघात आणि किती कुटुंबांचे दिवे विझल्यानंतर सरकार जागे होणार?” असा सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनावेळी तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, शहराध्यक्ष प्रणय धोटे, तालुका उपाध्यक्ष विपक मडावी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page