गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २८ ऑगस्ट :निसर्गसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राष्ट्रीय गड-किल्ले संवर्धन समिती, राजुरा यांच्या टीमने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्य हरिश्चंद्रगड तसेच आडराई वन परिसराला भेट दिली. या भेटीदरम्यान टीमच्या सदस्यांनी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
हरिश्चंद्रगड परिसरातील समृद्ध जैवविविधता, हिरवाई आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना निसर्गाच्या संवर्धनाची वाढती गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच आडराई वन परिसरात वृक्षारोपण करून वनसंपदा जपण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी उर्मिला म्हरसकोल्हे, सुनैना तांबेकर, बबिता कांबळे, शुभांगी मुसळे, माधुरी कोल्हापुरे, मेघा धोटे, मंजू लोहे, सीमा काहीलकर व प्रतीक काकडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा आणि निसर्गाचे संवर्धन करा’ असा संदेश देत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. पर्यटन करताना केवळ निसर्गसौंदर्याचा आनंद न घेता, निसर्गाची जपणूक करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन समितीच्या सदस्यांनी केले. निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेल्या या उपक्रमातून पर्यावरणप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गसंवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

