जि. प. शाळा टिकविण्यासाठी चनाखा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.

HomeNewsनागपुर डिवीजन

जि. प. शाळा टिकविण्यासाठी चनाखा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.

– पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरकर व पाणीकर माफ.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :–
गावातील जिल्हा परिषद शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. गावातीलच शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढावा आणि गावची शाळा टिकून राहावी, या उद्देशाने ग्रामपंचायत चनाखा यांनी एक अभिनव व कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चनाखा येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरकर व पाणीकर माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे पालकांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच गावातील शाळेच्या विद्यार्थीसंख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.
‘गावाची शाळा, गावाची जबाबदारी’ या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ करमाफीपुरता मर्यादित नसून, गावातील शैक्षणिक व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामपंचायतीने उचललेले प्रेरणादायी पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमांतर्गत दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने घरकर व पाणीकर माफीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा चे माजी सभापती तथा चनाखा ग्रामपंचायत चे सदस्य विनोदभाऊ देवाळकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत चनाखाच्या प्रशासक सुनीताताई सातपुते होत्या. प्रमुख अतिथी उपसरपंच राजेश सातपुते, ग्रा. प. सदस्य ज्योत्सना वानखेडे, रेखाताई आकनूरवार व प्रतिभाताई मडावी उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक पवन कातकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनीताताई मडावी, सदस्य सीमा साळवे, प्रीती रामटेके, सुनील गौड व सुनीता टेकाम, शाळेचे मुख्याध्यापक धनराज सिडाम यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विज्ञान शिक्षक धनराज दुर्योधन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. प. सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाशभाऊ दुर्योधन यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक विनोद बेले यांनी मानले.

You cannot copy content of this page