–
क्रिकेट व बुद्धिबळात चमकदार यश ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– इन्फंट जीजस सोसायटीद्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर घातली आहे. क्रिकेट आणि बुद्धिबळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चमक दाखवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
१७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत इन्फंट शाळेचा संघ विजयी कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. संघातील अमित कुमार, सोहम पायपरे, आर्यन इर्की, सुरज मेंगरे, स्मित टिकरे, नैतिक बोबडे, सोहम पेटकुले, सुरज शहा, युग चव्हाण, भावेश पिंपळकर, नैतिक गाडगे, अथर्व देवाळकर, आर्यन सिंग, अंशुल ताजणे आणि भाव्यांशू करदोडे यांनी सांघिक एकजूट, उत्कृष्ट फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि चोख क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
बुद्धिबळ स्पर्धेतही विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सनत मलेश बंडा व कुणाल सतीश थेरे, मुलींच्या गटात संतोषी चंदू पवार, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ मलेश बंडा, तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात आयुष गजानन येरणे, ओम राजेश उलमाले व आरीज पाशा जमाई यांनी चमकदार कामगिरी केली. मुलींच्या १९ वर्षांखालील गटात मैथिली प्रमोद जल्लेवार व अविका मारुती चिंचोलकर यांनीही आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. बुद्धिबळातील एकाग्रता, अचूक डावपेच, नियोजनबद्ध खेळ आणि प्रसंगावधान यांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, रोहित शर्मा, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

