वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; वडाचे झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

HomeNewsनागपुर डिवीजन

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; वडाचे झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

जाधव दांपत्याचा पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचा संकल्प.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.८
ऑक्टोबर वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श ग्रामसखी तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राजुरा तालुका महिला संघटिका शिला दिलीप जाधव, लक्कडकोट यांनी घालून दिला. त्यांना दिलीप जाधव, तालुका संघटक यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट येथील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या अंदाजे ११५ विद्यार्थ्यांना बूक व पेनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तसेच खिर्डी गावात एकही मोठे वडाचे झाड नसल्याने वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व, झाडांमुळे होणारे फायदे तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लावलेल्या झाडाची नियमित देखरेख, पाणी देणे व त्याचे संगोपन कशा पद्धतीने करावे, याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. शिला जाधव या बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी तसेच साक्षरता अभियानाच्या माध्यमातून आदिवासी कोलाम समाजातील नागरिकांना साक्षर करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकासाच्या विविध उपक्रमांमध्येही त्या नेहमीच सक्रिय सहभाग घेत असून परिसरातील गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेतात.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व संघटक यांनी कौतुक करून शिला जाधव यांचे अभिनंदन केले.
“वाढदिवस साजरा करण्याची अनोखी पद्धत—विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार आणि पर्यावरणासाठी वडाचे झाड!” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

    You cannot copy content of this page