गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.६ ऑगस्ट शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवाडा येथे प्रा. हरिभाऊ डोर्लीकर यांच्या ‘संमोहन स्टेज शो’ चे (Hypnotism show) यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक मुख्याध्यापक सौ. संध्या वामनराव रिंगणे लाभल्या होत्या. प्रा. हरिभाऊ डोर्लीकर यांनी आपल्या संमोहनाच्या विविध प्रयोगातून मनाची एकाग्रता, अभ्यासातील लक्ष आणि सूप्त मनाची ताकद याबद्दल विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अत्यंत रंजक आणि उद्बोधक माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या अंधश्रद्धा दूर करत शास्त्रीय दृष्टिकोन पटवून देणे हा या शोचा मूख्य उद्देश होता. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना माध्यमिक मुख्याध्यापक सौ. संध्या रिंगणे यांनी सांगितले की “अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी मनाचे नियंत्रण किती महत्त्वाचे आहे हे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव वैरागडे ,माध्यमिक शिक्षक यांनी केले तर उपस्थितांचे आभार रविंद्र जाधव , उच्च माध्यमिक शिक्षक यांनी मानले. या कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


