महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर नेणारा अर्थसंकल्प – आमदार देवराव भोंगळे

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर नेणारा अर्थसंकल्प – आमदार देवराव भोंगळे

गौतम नगरी चौफेर //गडचांदूर// – आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा २०४७ च्या विकसित महाराष्ट्राचा एक सशक्त रोडमॅप असून प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित असलेला राज्याच्या संतुलित विकासाला खऱ्या अर्थाने चालना देणारा आहे.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि माता-भगिनींच्या आयुष्यात हा अर्थसंकल्प नवी पहाट घेऊन आला आहे. विशेषतः ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना’ आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देऊन सरकारने बळीराजाला मोठे बळ दिले आहे. ‘बळीराजा पाणंद रस्ता’ योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.

आमच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी हा अर्थसंकल्प अत्यंत आश्वासक आहे. विदर्भाची भाग्यरेषा ठरणारा ‘वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प’ मार्गी लागल्याने सिंचनाचा प्रश्न सुटून शेती समृद्ध होईल. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा आता देशाचे नवे ‘स्टील हब’ म्हणून उदयास येत असून, यामध्ये होणारी २ लाख कोटींची गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारे ७० हजार रोजगार हे विदर्भाचे चित्र बदलणारे ठरेल. ‘महाराष्ट्र बांबू धोरण’ आणि बांबू विकास प्रकल्पांमुळे उद्योगाला व बांबू आधारित व्यवसायांना मोठी चालना मिळणार तसेच बल्लारपूर येथे जागतिक कीर्तीचे टिंबर म्युजियम व झायलरीयम होणार असल्याने स्थानिक युवकांसाठी नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघू केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय क्रांतिकारी असून, याद्वारे राज्यात ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कायम ठेवण्याचा निर्णय हा जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर माता-भगिनींचा सन्मान करणारा आहे. तसेच ‘प्रधानमंत्री सौर योजने’अंतर्गत रूफ टॉप सोलर उभारण्यावर दिलेला भर सर्वसामान्यांचे वीज बिल कमी करण्यास मदत करेल. ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तून १,००० लोकसंख्या असलेली गावे कॉंक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय देखील ग्रामीण भागाचा कायापालट करणारा ठरेल.

सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याचा निर्णय आणि ‘काम करणारा माणूस’ दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करून प्रशासकीय सुशासनाला दिलेली दाद, ही या अर्थसंकल्पाची संवेदनशील बाजू आहे. पायाभूत सुविधा, ७५ हजार नवीन पदभरती आणि नागरी विकासाच्या १० प्राधिकरणांमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ प्रगती करेल. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– आमदार देवराव भोंगळे, राजुरा विधानसभा

COMMENTS

You cannot copy content of this page