महावितरण गडचांदूर उपविभागाचे विभाजन करा!

HomeUncategorized

महावितरण गडचांदूर उपविभागाचे विभाजन करा!

कोरपना येथे नवे कार्यालय स्थापन करण्याची ओम पवारांची मागणी.

गौतम नगरी चौफेर आवारपूर :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या गडचांदूर उपविभागाचे वाढते कार्यक्षेत्र आणि ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन, या उपविभागाचे त्वरित विभाजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांना दिले आहे.

गडचांदूर उपविभागाचे विभाजन करून उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग कार्यालय, कोरपना येथे कार्यान्वित करण्यात यावे. यामुळे कोरपना तालुक्यातील तसेच लगतच्या भागातील हजारो वीज ग्राहकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. वाढता व्याप आणि नागरिकांची गैरसोय टाळता येणार. गडचांदूर उपविभागाच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण कोरपना तालुका, तसेच राजुरा व जिवती तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. या उपविभागाचे कार्यक्षेत्र १४० हून अधिक गावांमध्ये पसरले असून, ३६ हजार हून अधिक वीज ग्राहक आहेत. या व्यापक विस्तारामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, कोरपना तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील शेवटच्या गावापासून गडचांदूरचे अंतर ४२ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वीज बिलांसंबंधी, तक्रारींसाठी किंवा इतर कोणत्याही उपविभागीय कामासाठी नागरिकांना गडचांदूर येथे जा-ये करण्यासाठी मोठा वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कोरपना या तालुका स्थळी नवीन उपकार्यकारी अभियंता कार्यालय स्थापन झाल्यास कोरपनासह वनसडी, पारडी, कोडशी बुज, नारंडा आणि जिवती तालुक्यातील धनकदेवी परिसरातील ग्रामस्थांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, महावितरणच्या सुविधा अधिक जलद आणि कार्यक्षमतेने ग्राहकांपर्यंत पोहोचतील.

“वीज ग्राहकांना ४०-४२ किलोमीटरचा प्रवास करून गडचांदूर येथे जावे लागणे हे अत्यंत गैरसोयीचे आहे. कोरपना हे तालुका मुख्यालय असल्याने येथे उपकार्यकारी अभियंता कार्यालय स्थापन झाल्यास कोरपनासह वनसडी, पारडी, नारंडा आणि जिवती परिसरातील हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल. आमदार देवरावदादा भोंगळे यांचे कडे मागणी केली आहे की, हे विभाजन तत्काळ करून प्रशासकीय कारभारात सुधारणा करावी.”
:- ओम पवार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, तथा उपसरपंच धानोली.

COMMENTS

You cannot copy content of this page