गौतम नगरी चौफेर भंडारा – 6 महिन्यापासून राशन दुकानदारांना कमिशन नाही! रास्त भाव दुकानदारांनी आत्महत्या करावी काय?
जिल्ह्यातील आमदाराने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची गरज! भंडारा : सरकारी रास्त भाव दुकानदारांना मागील 6 महिन्यापासून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ,ऑक्टोबर, नोव्हेंबर या 6 महिन्यांचे कमिशन रास्त भाव दुकानदारांच्या खात्यात अजूनही जमा झालेले नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या रास्त भाव दुकानदारांची खाती पूर्वीच्या विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेत (सध्याची महाराष्ट्र ग्रामीण बँक) आहेत, त्यांची कमिशनची रक्कम बँकेच्या IFSC कोड आणि खाते क्रमांकात झालेल्या बदलामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या तांत्रिक बदलामुळे दुकानदारांचे कमिशन अडकून पडले असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे अनेक दुकानदारांवर आत्महत्या करण्याची पाळी आल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या दुकानदाराने टोकाचे पाऊल उचलले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी अन्नपुरवठा विभागाची असेल, असा गंभीर इशारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिलेला आहे. या दुकानदारांच्या कमिशन च्या बाबतीत भंडारा जिल्ह्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे तारांकित प्रश्न उपस्थित करून दुकानदारांना न्याय मिळवून देण्यात यावा. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील सर्व बाधित दुकानदारांची जिल्हा पुरवठा विभागाकडे मागणी आहे की, विभागाकडून मंत्रालय स्तरावर तात्काळ कारवाई करून थकीत 6 महिन्यांचे कमिशन त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, जेणेकरून दुकानदारांना लवकरात लवकर दिलासा मिळेल.


COMMENTS