गौतम नगरी चौफेर बांदल बेले राजुरा, दि.३ नोव्हेंबर
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, नागपूर विभाग, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने जिवती तालुक्यातील पाटागुडा येथील कोलाम आदिवासी गुड्यावर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून कोलाम आदिवासी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला कपडे, ब्लँकेट, फराळ तसेच शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या नागपूर विभाग महिला अध्यक्षा रजनी शर्मा होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पाटण चे सरपंच सीताराम मडावी, जिवतीचे पत्रकार सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा आर्या दि बेस्ट अकॅडमी, जिवतीचे प्रशिक्षक भीमराव पवार उपस्थित होते. तसेच संस्थेचे मिलिंद गद्दमवार, अरुणा सालवटकर, बबिता कांबळे यांची सत्कारमूर्ती म्हणून उपस्थिती होती. या उपक्रमात मानवी करमनकर, मीनल व प्रियल देशकर, प्रतीक काकडे आणि बलवंत ठाकरे या युवा पिढीतील (जनरेशन झी) सदस्यांनी विशेष सहभाग नोंदविला. यावेळी पाटागुडा येथील कोलाम आदिवासी कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीची व कुटुंबाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जीवनावश्यक वस्तूंसह दिवाळीचा फराळ आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोलाम आदिवासी वस्तीवर संस्थेचा सातत्यपूर्ण दीपोत्सव उपक्रम नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी कोलाम आदिवासी बांधवांसोबत दीपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. आतापर्यंत जिवती व राजुरा तालुक्यातील घोडनकपी, खडकी, रायपूर, लाकडकोट चेकपोस्टजवळील कोलाम आदिवासी वस्ती, कोष्टाळा परिसरातील जुनी व नवी बगलवाई, डोंगरगावजवळील जुने व नवे बापूनगर अशा विविध दहा आदिवासी गुड्यांवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. केवळ सण साजरा करणे नव्हे, तर आदिवासी बांधवांशी आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांच्या आनंदात सहभागी होणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गुंडावार यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी केले, तर आभार नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश साखरकर, संचालक ज्योती कॅटर्स तथा ओमसाई मंगल कार्यालय, राजुरा यांनी चकली, चिवडा व बालुशाही असा दिवाळीचा फराळ उपलब्ध करून दिला. तसेच संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन समिती, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, राष्ट्रीय महिला हिंसाचार प्रतिबंधक समिती, राष्ट्रीय गड-किल्ले संवर्धन समिती यांसह विविध समित्यांचे पदाधिकारी, सदस्य व संघटक यांनी तन-मन-धनाने सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्वांनी एकत्रित वनभोजनाचा आनंद घेतला. सामाजिक बांधिलकी, मानवता आणि आपुलकीचा संदेश देणारा हा दीपोत्सव पाटागुडा येथील कोलाम आदिवासी बांधवांसाठी आनंददायी ठरला. राजुरा, गडचांदूर, बल्लारशाह, चंद्रपूर , नागपूर, कोरपना, जिवती आदी तालुक्यातील पदाधिकारी सदस्य संघटक सहभागी झाले होते.

