MASS-2 उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांची केली तपासणी; शाळेतील विविध उपक्रमांचे केले कौतुक.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १६ ऑक्टोबर
पंचायत समिती कोरपना येथील माजी गटशिक्षणाधिकारी तथा गडचांदूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय कल्याण जोगदंड यांनी गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कढोली (खुर्द) येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक कार्याचा व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान ‘मिशन अंगणवाडी – शाळा सक्षमीकरण (MASS)-2’ या उपक्रमांतर्गत शाळेतील अतिरिक्त पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. शाळा मूल्यांकन प्रपत्राच्या अनुषंगाने विविध अतिरिक्त भौतिक सुविधा व शाळेच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी शिक्षकांशी चर्चा केली. तसेच प्रत्यक्ष वर्गखोल्या आणि शाळेतील इतर भौतिक सुविधांची पाहणी करून मूल्यांकन प्रपत्र भरले. यावेळी शाळेतील उपक्रमशील व वृक्षप्रेमी शिक्षक भास्कर करमनकर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये आदर्श परिपाठ, निपुण महाराष्ट्र, आनंददायी दप्तरमुक्त शनिवार, वाचनालय, पालक संपर्क, पालक सभा, माता पालक गट, परसबाग, विज्ञान प्रयोगशाळा, विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे सराव वर्ग, नवरत्न स्पर्धा तसेच बालक्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी आदी उपक्रमांचा समावेश होता.
शिक्षण विस्तार अधिकारी जोगदंड साहेब यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करताना शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचा सुंदर व सुस्थितीत असलेला परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे शाळेतील शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळाले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.




