अब्दुल गणी पटेल विद्यालयाच्या विद्यार्थिनीची घवघवीत कामगिरी; जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा , दि.१७ ऑक्टोबर
नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवाडा येथील अब्दुल गणी पटेल विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. महिमा संतोष चेनुरवार हिने विज्ञान प्रतिकृती (प्रोजेक्ट) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयासह देवाडा गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी गटातून सहभागी झालेल्या कु. महिमा चेनुरवार हिने आपल्या विज्ञान प्रतिकृतीच्या माध्यमातून कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विषयाचे सखोल आकलन यांचे दर्शन घडविले. तिच्या प्रकल्पाला परीक्षकांकडून भरभरून कौतुकाची थाप मिळाली. या यशामुळे तिची पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. महिमाच्या या यशामागे विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षिका दुर्गाश्री वाढई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली महिमाने हा प्रकल्प साकारला. विद्यार्थिनीच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाल्याने तिला हे उल्लेखनीय यश संपादन करता आले. महिमाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सिद्धार्थजी पथाडे, सचिव सौ. गीताताई सिद्धार्थ पथाडे, मुख्याध्यापक श्री. प्रकाशजी गिरसावळे, शिक्षकवृंद तसेच गावकऱ्यांनी तिचे आणि मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही महिमाने उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
महिमाच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास आणि विज्ञान विषयातील संशोधनाची आवड निर्माण करण्यास निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

