गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१ ऑगस्ट बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना इको क्लबच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्याघ्र संवर्धन, पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेवर आधारित आकर्षक चित्रे साकारून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या ‘वसुंधरा मित्र’ उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन, जैवविविधता, अन्न, ऊर्जा व पाणी या पाचही गटांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण सहाय्यक शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेत अहिशा प्रमोद धानोरकर हिने प्रथम क्रमांक, आलिया रियाज शेख द्वितीय व अक्षरा अविनाश निमकर तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेतील सहभागी तसेच क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे दिगंबर बल्की, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, गजानन इंगळे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग राजुरा, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर तसेच सुनील मेश्राम वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले. याकरिता विद्यार्थी प्रमुख श्रावण वामन सुर्तेकर, विद्यार्थिनी प्रमुख वेदांती किशोर भोंगळे तसेच पाचही गटांच्या संघ प्रमुख, संघ सह प्रमुख यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.


