गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२२ ऑगस्ट समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या उद्देशाने कार्यरत असलेल्या सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १३५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजावी, या उद्देशाने या बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्यासाच्या वतीने सौ. पल्लवी लिचोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी अंगीकारणे, मोठ्यांचा आदर करणे, सत्य, शिस्त, प्रामाणिकपणा व सेवाभाव यांसारखी नैतिक मूल्ये आचरणात आणणे, तसेच आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालवयात मिळणारे संस्कार व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात, याची जाणीवही विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. ताणतणावमुक्त जीवनशैलीबाबत प्रबोधन तसेच समाजजागृतीचे विविध उपक्रम न्यासाच्या वतीने आयोजित केले जातात. याच समाजोपयोगी कार्याचा एक भाग म्हणून बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. उषा उरकुडे, सौ. जया बरडे आणि सौ. रत्ना तुमाने यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
बालकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच संस्कारक्षम, संवेदनशील, जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी पिढी घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही शिबिरातील मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत चांगले संस्कार आपल्या आचरणात आणण्याचा संकल्प केला.

