गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या यशाला मिळालेली प्रेरणेची शाबासकी — ॲड. जयंत साळवे

HomeNewsनागपुर डिवीजन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या यशाला मिळालेली प्रेरणेची शाबासकी — ॲड. जयंत साळवे

एचएससी, एसएससी व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ८
ऑगस्ट महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथे एचएससी, एसएससी बोर्ड तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे अध्यक्ष ॲड .जयंत साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सुभाष ताजणे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे , राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुलजी राठोड , संस्थेच्या सहसचिव नलिनी साळवे, विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता धोटे , पर्यवेक्षक दयानंद चिंतलवार, तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख राजू डाहुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे यांनी संघटनेच्या वतीने जयंत साळवे सुभाष ताजणे तसेच प्राचार्या स्मिता धोटे यांचा शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यानंतर एचएससी, एसएससी बोर्ड तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. एचएससी परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सारिका श्रीनिवास रामगिरवार, सेजल अर्जुन साकीनाला आणि नंदा अजय वरवाडे यांचा तर एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुस्कान फिरोज पठाण, अल्फिया जावेद शेख, सानिया जानकीराम सोनेकर, श्रेया मारोती लोखंडे आणि सागर अनिल पिदूरकर या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या पुनेश्वर घनश्याम सूरकर, कोमल जोगेश्वरी सिडम, तस्मिया इर्शाद कुरेशी, शर्वरी नमेश मडावी, पल्लवी बंडू तोडाशे आणि दिव्या जगन्नाथ भलवे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनदास मेश्राम यांनी केले. राजू डाहुले व गीतमंच यांच्या सहभागातून स्वागत गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चिंतलवार यांनी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे योगदान अधोरेखित करून भविष्यातही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षिका पी. एस. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सत्कार सोहळ्यास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली.

    You cannot copy content of this page