गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,दि. १३ जुलै राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईत एकूण १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षकांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, रामनगर सास्ती येथील कोलगाव रोडवरील राममंदिर परिसरात एक संशयित इसम शस्त्र बाळगून फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव श्रीराज संग्राम बहुरिया (वय २२ ),
रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारशाह, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर असे सांगितले. त्याच्या झडतीदरम्यान पँटमध्ये लपवून ठेवलेला एक गावठी देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या कट्ट्याची किंमत १० हजार रुपये तर काडतुसाची किंमत ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ , २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चांगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांचे पथकाने केली.

