गडचिरोलीतील पूजा अमित घरामीला न्याय कधी मिळणार? पती व सासरच्या मंडळींकडून छळाचा आरोप; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह!

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचिरोलीतील पूजा अमित घरामीला न्याय कधी मिळणार? पती व सासरच्या मंडळींकडून छळाचा आरोप; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह!

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे गडचिरोली : आपल्या भारत देशात महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायासाठी विविध कायदे असतानाही आजही एका विवाहित महिलेला न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याची धक्कादायक बाब गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी गावातून समोर आली आहे.
पेंढरी येथील सासरी गेलेल्या माहेरच्या लाडक्या लेकी पूजा अमित घरामी हिचा विवाह दिनांक 05 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. मात्र, लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने घेऊन सासरी गेलेल्या पूजाला सन्मान आणि प्रेम मिळण्याऐवजी पती अमित अखिल घरामी याच्याकडून मारहाण, शिवीगाळ, अपमान आणि मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पूजाच्या म्हणण्यानुसार, तिचा पती दारूच्या नशेत तिच्याशी मारहाण व गैरवर्तन करीत असे. एवढेच नव्हे तर तिला तब्बल एक तास बाथरूममध्ये बंद करून ठेवल्याचाही आरोप आहे. या परिस्थितीत तिने पोलिसांकडे मदतीची मागणी केली; मात्र अपेक्षित मदत मिळाली नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
याशिवाय, पती अमित घरामी याचे पाखांजूर येथील प्रियंका नावाच्या मुलाशी पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप पूजाने केला आहे. या कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर पूजाला संसारातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा तिचा दावा आहे.
सर्वात गंभीर आरोप म्हणजे पूजाच्या गळ्यात साडी आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न पती अमित घरामी व त्याच्या कुटुंबीयांनी केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेशी संबंधित साडी हा महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पूजाने पेंढरी पोलिसांकडे मदत मागितल्यानंतरही न्याय मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. तसेच तिची तक्रार गांभीर्याने न घेता प्रकरण खोटे असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असून सासरच्या मंडळींच्या बाजूने भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.
न्यायासाठी पूजाने गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र, तेथेही अपेक्षित न्याय न मिळाल्याने तिने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP), मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
आता न्यायालयात लढा; सुनावणीच्या तारखेबाबत संभ्रम
पोलीस तपासावर असमाधान व्यक्त करत पूजा अमित घरामी हिने गडचिरोली न्यायालयात प्रोटेस्ट पिटीशन (Protest Petition) दाखल केली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणीची तारीख मिळाल्याचे सांगण्यात येते.
मात्र, धानोरा न्यायालयातील तारखेबाबतही संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला न्यायालयाकडून 28 ऑक्टोबर 2026 ही तारीख देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून फोनद्वारे पुढील तारीख 19 नोव्हेंबर 2026 असल्याचे सांगण्यात आल्याचे पूजाच्या बाजूने नमूद करण्यात आले आहे.
सुनावणीची तारीख बदलण्यामागील कारण काय? प्रकरणाच्या सुनावणीत विलंब का होत आहे? पीडित महिलेला वेळेत न्याय मिळणार की तिला आणखी किती काळ संघर्ष करावा लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निष्पक्ष चौकशी आणि न्यायाची मागणी
पूजा अमित घरामी हिच्या प्रकरणातील सर्व आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, कथितरीत्या नष्ट झालेल्या पुराव्यांची तपासणी करण्यात यावी, उपलब्ध साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत आणि तपासातील त्रुटींची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
एका मुलीला लग्न करून सासरी पाठवताना तिच्या आई-वडिलांच्या मनात सुखी संसाराची स्वप्ने असतात. मात्र, त्याच मुलीला न्यायासाठी पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस कार्यालयापर्यंत आणि आता न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागत असेल, तर ही गंभीर चिंतेची बाब आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, पूजा अमित घरामीला न्याय कधी मिळणार? तिच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणार का? आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासन ठोस पावले उचलणार का?
पूजाला न्याय मिळावा, हीच तिच्या माहेरच्या कुटुंबीयांची आणि न्यायाची अपेक्षा असलेल्या प्रत्येक नागरिकाची मागणी आहे.

You cannot copy content of this page