गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१४ ऑक्टोबर शिक्षण विभाग,पंचायत समिती, राजुरा व ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२६-२७ चे उद्घाटन मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ॲड. यादवऱाव धोटे कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा येथे उत्साहात संपन्न झाले. सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत एनसीसी विद्यार्थ्यांच्या संचालन व बँड पथकाने झाले. यानंतर सभागृहात थोर शास्त्रज्ञ,डॉ.एपीजे अब्दुल कलाम, सी. व्ही.रमण, डॉ. होमी भाभा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वर्षातील विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय -“शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष” हा आहे सदर विषयावर आधारित एकूण ९३ प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या.

प्रदर्शनाचे उद्घाटन राजुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रज्ञाशील वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजीवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून गणेश येळणे, उपशिक्षणाधिकारी माध्य. जि. प. चंद्रपूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी पं. स. राजुरा तथा प्रदर्शनाचे आयोजक प्रमोद वळीव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विशाल शिंपी, सावनकुमार चालखुरे,तसेच संजय हेडाऊ, पोलीस अमलदार शरद राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वागताध्यक्ष म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे उपस्थित होत्या. प्रदर्शन संयोजक प्रा. इर्शाद शेख, प्रा.मकरंद मांढरे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यकमाचे उद्घाटक प्रज्ञाशील वाघमारे, मुख्याधिकारी, न. प. राजुरा यांनी उदघाटक म्हंणून बोलताना, “विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य घटक असून विद्यार्थ्यांनी प्रयोग करण्याचे धाडस ठेवावे. प्रयोगशीलतेतूनच प्रगतीचा मार्ग खुला होतो,” असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजीवाड यांनी वैज्ञानिक प्रारूप तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होते, असे सांगितले. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती कायम टिकली पाहिजे तसेच विज्ञान प्रदर्शनीत कला शिक्षकांचाही सहभाग असावा, कलेतूनच विज्ञानाचा जन्म झाला असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच यावर्षी नव्यानेच शिक्षकांच्या चर्चासत्राचे आयोजन प्रदर्शनात केले असल्याने सर्व शिक्षकांनी चर्चासत्रात सहभाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांनी प्रसिद्ध वैज्ञानिक व संशोधकांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच मोबाईलचा सुरक्षित वापर, सायबर गुन्हे आणि हॅकर्सकडून होणारी फसवणूक याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव यांनी “आजचे विद्यार्थी हे उद्याचे संशोधक आहेत,” असे सांगून विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक व्हावे व देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. शिक्षण विस्तार अधिकारी विशाल शिंपी यांनी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची वृत्ती असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, सर्जनशीलतेला आणि संशोधनवृत्तीला चालना मिळणार असून, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीचा संदेश देण्यात आला. यावेळी गटसाधन केंद्राचे संपूर्ण कर्मचारी वर्ग, सर्व केंद्रप्रमुख तसेच महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग यांनी उद्घाटन सोहळा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील सर्व शाळांचे सहभागी विद्यार्थी व त्यांचे शिक्षक वृंद यांनी उपस्थिती दर्शवून आजच्या सोहळ्याची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद वळीव यांनी केले. सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती ज्योती गुरनुले तर आभार प्रदर्शन दुसरे विषय साधन व्यक्ती मुसा शेख यांनी केले.
