जलस्रोतांचे नियोजन, पाण्याचा ताळेबंद व कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १५ ऑक्टोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (POCRA) चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील घोट्टा गावाला जागतिक बँकेच्या पथकाने सरपंच ,वनहक्क समिती व गावकऱ्यांशी दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित सभेत भेट घेतली. यावेळी जागतिक बँकेचे प्रतिनिधी वरुण सिंग व अनुपम जोशी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात पेसा अंतर्गत घोट्टा येथील वन हक्क समितीच्या सदस्यांशी चर्चा करून प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत गावातील पाण्याचा ताळेबंद (Water Budget), उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन व व्यवस्थापन, तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी व जलसंधारणविषयक योजनांची माहिती घेण्यात आली. संबंधित योजनांचे निकष, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि गावपातळीवरील कामकाज याबाबत पथकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
गावातील उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर, पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर बैठकीत विशेष भर देण्यात आला. प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि ग्रामीण भागातील कृषी विकासाला चालना देणे या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या क्षेत्रीय भेटीदरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे उपसंचालक संतोष ममदापुरे, डीबीटी तज्ज्ञ संजय काचोळे, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, पर्यावरण तज्ज्ञ अभिजित कांबळे, समाजशास्त्रज्ञ प्रज्ञा सावंत (पीएमयू, मुंबई), चंद्रपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार, राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास जाधव, तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे चंद्रपूर जिल्हा नोडल अधिकारी सूरज भांगरे तसेच राजुरा येथील सहायक वनसंरक्षक (ACF) गिरडकर सर उपस्थित होते. याशिवाय संबंधित तालुका कृषी अधिकारी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी, घोट्टा गावच्या सरपंच लक्ष्मी पोरशेट्टी, वन हक्क समितीचे अध्यक्ष कार्तिक आत्राम आणि समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या भेटी दरम्यान जलसंधारण व शाश्वत व्यवस्थापनावर भर देण्यात आला. या क्षेत्रीय भेटीमुळे प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेण्यासोबतच त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी वन हक्क धारकांना योजनेच्या अनुषंगाने कोणते घटक राबविता येथील याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गावातील जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर आणि कृषी विकासासाठी उपलब्ध योजनांचा प्रभावी विनियोग याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीमुळे गावपातळीवरील विकासकामांचे मूल्यमापन करण्यास तसेच भविष्यातील नियोजनासाठी उपयुक्त माहिती मिळण्यास मदत झाली.

