दोन विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी घेतले दत्तक; वसतिगृहाला ग्रीन मॅट व नेफडोला २० कुंड्यांची भेट.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१ ऑक्टोबर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजुरा आगारातील वाहतूक निरीक्षक माणिकराव बोबडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी करण्यात आले. सेवानिवृत्तीचा आनंद केवळ सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श त्यांनी यावेळी घालून दिला. यावेळी अंकित कामतकर, वाहतूक निरीक्षक, अतुल वासेकर, लेखापाल, अरविंद ठमके, वरिष्ठ लिपिक, संजय सोमणकर, संघटना विभागीय सचिव, अश्विन येळमुले, संघटना विभागीय अध्यक्ष तसेच संतोष वासेकर, संघटना आगार अध्यक्ष यांच्यासह एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. बादल एन. बेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुले व मुलींचे वस्तीगृह महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा चे मेश्राम, आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रविन मेकर्तीवार उपस्थित होते.

सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे औचित्य साधून माणिकराव बोबडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुला-मुलींच्या वसतिगृहातील ओम गणेश चापले व आयुष बंडू बोरीकर या दोन विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी दत्तक घेतले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च स्वतः करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन ग्रीन मॅट भेट देण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला (नेफडो) २० कुंड्या भेट देऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला सहकार्य केले.

यावेळी “प्लास्टिक बुके टाळा, रोपटं-कुंडी देऊन स्वागताचा नियम पाळा” या पर्यावरणपूरक उपक्रमालाही माणिकराव बोबडे यांनी सहकार्य केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वसतिगृहाला उपयोगी साहित्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी कुंड्यांची भेट देत माणिकराव बोबडे यांनी सामाजिक दायित्वाची जपणूक केली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद ठमके यांनी केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून स्नेह भोजन दिले व या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

